Type Here to Get Search Results !

संतसूर्य

नवनिर्वाचित आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडून मंगळवेढेकरांच्या वाढल्या अपेक्षा. 


मंगळवेढा / प्रा.विक्रांत पंडित 

 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार समाधान दादा आवताडे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके यांचा सुमारे आठ हजार मताने पराभव केला. सलग दुसरी वेळ ते लोकप्रतिनिधी झाले .भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे .आता राज्यात देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहिली आहे. मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लोकप्रतिनिधी झाला आहे .यामागे या मतदारसंघातील जनतेने आपल्या विकासाचा बॅकलॉग पूर्ण व्हावा, विकास कामे पूर्ण व्हावीत, लोकप्रतिनिधींच्या इच्छेनुसार होत असलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी या मतदारसंघातील सामान्य जनतेने विकासाला मतदान केले आहे .यामुळे आमदार आवताडे यांच्यासमोर आता मतदारसंघातील सर्वच प्रश्नाला न्याय देणे निधी उपलब्ध करून देणे, प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देण्याची जबाबदारी आली आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये मला माझा संसार पूर्ण झाला आहे, आता मला तुमचा संसार चांगला करायचा आहे म्हणून मला निवडून द्या असे आवाहन केले होते .या आवाहनाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे .यामुळे दक्षिण भागात कीड्या- मुंग्यासारखे जगणारे जनतेला पुढील पाच पिढ्या सक्षम पणे आर्थिक दृष्ट्या अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल या पद्धतीने आता आमदार समाधान दादा आवताडे यांना या भागाचा विकास करावा लागणार आहे. मी दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा आमदार आवताडे यांनी या भागातील तरुणांना करण्यास भाग पाडले होते ती प्रतिज्ञा मतदारांनी पूर्ण केली आहे .यामुळे या भागात कृषी -पूरक अनेक व्यवसाय त्यांना उभा करता येणे शक्य आहे. मोठे दूध संकलन केंद्र करून या भागातील शेतकऱ्यांना गो पालन व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, शेळ्या-मेंढ्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे. जेणेकरून या भागातील जनतेला शेतकऱ्यांना शेतात पाणी आल्यानंतर शेती करता येईल .कुटीर उद्योग करता येतील. या भागात हरितक्रांती घडवून आणता येईल. माळरान हिरवेगार होईल यासाठी आमदार आवताडे यांना या पाच वर्षात अधिक कष्ट घ्यावे लागणार आहे .24 गावचे पाणी माळाने पाईपलाईन द्वारे फिरल्यानंतर या भागात शेतकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे सोने होणार आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांना अधिक महत्त्व द्यावे लागणार आहे. सत्ता मिळवणे ,सत्ता टिकवणे, त्याचा लाभ घेणे यापेक्षा मिळालेल्या सत्तेचा सामान्य जनतेसाठी अधिक वापर करून देणे ,सामान्य जनतेला न्याय देणे, एक अभियंता म्हणून अनेक अडचणीवर मात करत त्यांनी या 24 गावातील जनतेला पाणी मिळवून देणे, त्यांच्या आयुष्याचे सोने करणे ही त्यांची आता नैतिक जबाबदारी राहिली आहे .मंगळवेढा तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ,परंतु त्यांनी सजग नागरिक संघाच्या सहकार्याने व शासनाच्या मदतीने मंगळवेढा शहरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आहे. तर ग्रामीण भागात निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे .यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवला आहे. 70 वर्षांमध्ये आपला लोकप्रतिनिधी झाल्यानंतर काय होऊ शकते ,हे त्यांनी दाखवून दिले आहे .आता या मंजुरीचे रूपांतर पूर्ण कामात करून घेणे ही पाच वर्षाची मुख्य जबाबदारी राहणार आहे.मंगळवेढा शहरात शिक्षणासाठी दहा कोटींचा इमारत निधी उपलब्ध करून दिला .काम सुरू झाले आहे परंतु याबरोबर प्राथमिक शिक्षणा बरोबर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व दर्जा वाढण्याची गरज आहे .अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सुरू होण्याची गरज आहे यासाठी आमदार आवताडे हे स्वतः सक्षम असल्यामुळे ते येत्या पाच वर्षात मंगळवेढा तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज सह अनेक उद्योग करणारे कॉलेज सुरू करतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. मंगळवेढा शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणे, संत दामाजी, संत चोखामेळा ,संत कान्होपात्रा ,संत बंका ,संत निर्मळ,संत महात्मा बसवेश्वर यांच्यासह अनेक संत मंगळवेढा संत नगरीत होऊन गेले आहेत. या सर्वांसाठी मंगळवेढा संत नगरी म्हणून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून शहराचा विकास करण्याची गरज आहे .महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून अभ्यासक या मंगळवेढा संतभूमीत आले पाहिजेत ,त्यांची राहण्याची व जेवणाची चांगली सोय होण्यासाठी या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आमदार आवताडे यांनी स्वीकारली पाहिजे व त्या पद्धतीने राज्यस्तरीय पातळीवरचे संत सृष्टी मंगळवेढ्यात उभा करण्याची गरज आहे . किल्ला भागातील महादेव विहिरीमध्ये ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती आहे. ब्रह्मदेवाची मूर्ती ही देशात अतिशय दुर्मिळ असल्यामुळे त्याचे संगोपन करणे ,त्याचे मार्केटिंग करणे व धार्मिक पर्यटन करण्यासाठी चांगले मार्केटिंग करण्याची गरज आहे .मात्र यासाठी ब्रह्मदेवाच्या मूर्तीचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे.
नंदुर ,डोणज परिसरात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सुमारे एक हजार एकर जमीन उपलब्ध आहे. या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्याची गरज आहे .या स्मारकाच्या परिसरात हेलिपॅड सह कृषी पर्यटन, जल पर्यटन याशिवाय महात्मा बसवेश्वरांचे साहित्य उभे करणे शक्य आहे. कर्नाटकातील कुंडल संगम हे क्षेत्र सुमारे अडीचशे एकराचे आहे. त्या ठिकाणचे सभागृह दहा हजार व्यक्ती एका वेळी त्या सभागृहात बसू शकतात .या सभागृहाचे वैशिष्ट्य, हे संपूर्ण स्टीलचे असून प्रत्येक खुर्चीत बसलेल्या माणसाला व्यासपीठ फ्रंटवर असल्यासारखे दिसते .इतके अभियांत्रिकी ज्ञान या ठिकाणी वापरण्यात आले आहे .त्या पद्धतीने या हजार एकर क्षेत्रामध्ये केंद्र शासनाकडून दहा ते वीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणणे .यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्राचे नेते भाजपाचे भावी राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे. यामुळे मंगळवेढा नव्हे तर पंढरपूर -मंगळवेढ्याचे भवितव्य बदलणार आहे. या माध्यमातून या भागातील जनतेला या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. कुंडल संगम जर राष्ट्रीय पातळीवरील पर्यटन स्थळ होत असेल तर महात्मा बसवेश्वरांचे स्मारक हे अभ्यास व धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून देशात नावा रूपाला आणण्याची जबाबदारी आमदार आवताडे यांनी स्वीकारण्याची गरज आहे .
मंगळवेढा तालुक्यामध्ये क्रीडा संकुलाची नितांत गरज आहे .सध्या असलेले शासकीय क्रीडा संकुल या ठिकाणी कोणते प्रकारचे खेळ राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळता येत नाहीत .या परिस्थितीत कृष्ण तलावालगत 42 एकराच्या जागेमध्ये पश्चिम बाजूला पंधरा एकर जागा क्रीडा संकुलासाठी शासनाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमदार आवताडे यांनी घेतली पाहिजे .यासाठी कृषी अधिकाऱ्यांची नव्हे तसेच क्रीडा अधिकाऱ्यांची देखील सल्ला ऐकण्याची गरज नाही .मुळात आमदार म्हणून या ठिकाणी शासनाला जागा उपलब्ध करून देणे .जागा एकदा उपलब्ध करून दिल्यानंतर क्रीडा संकुलाच्या नावाने जागा झाल्यानंतर राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी विविध खेळाचे साहित्य व क्रीडांगण उभा करण्यासाठी मिळू शकतो. ते आणण्याची ताकद आमदार आवताडे यांच्याकडे नक्कीच आहे. मैदानी स्पर्धेत सर्व प्रकारच्या स्पर्धा या मैदानावर होऊ शकतील. याच ठिकाणी जलतरण तलाव देखील उभा करता येणे शक्य आहे .ज्या पद्धतीने 24 गावचा पाणी प्रश्न आमदार आवताडे यांनी मार्गी लावला ,त्याच पद्धतीने स्वतः पैलवान असलेल्या आमदार आवताडे यांनी आपण देखील खेळाचा महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात ठेवून या ठिकाणी कुस्ती सह सर्वच खेळांना न्याय देण्याची गरज आहे.
संत दामाजी नगर, संत चोखामेळा नगर या परिसरामध्ये औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रातील काही भाग स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी समाधान दादा आवताडे यांनी विशेष वेळ देऊन विशेष प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. या भागातील सर्वसामान्य जनतेला याचा किती त्रास होतो याची त्यांनी कोणाबरोबरही चर्चा केली तरी त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येईल .यामुळे त्यांनी हा प्रश्न लावणे लोकप्रतिनिधी बरोबर एक मनुष्य म्हणून देखील ही जबाबदारी त्यांनी पार पडण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांना उद्योजक करण्यासाठी असलेल्या एमआयडीसीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. अनेक तरुणांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रकल्प उभा करण्याची तीव्र इच्छा आहे .परंतु जागा हवी ,या ठिकाणी उद्योग करता येत नाहीत .प्रकल्प उभा करता येत नाहीत .त्यामुळे या एमआयडीसीची जागेची मर्यादा वाढवून आणणे यासाठी आमदारा आवताडे यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांना या प्रश्नाबाबत व प्रश्न सोडवण्याबाबत पूर्ण ज्ञान आहे त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे .येत्या पाच वर्षात ते हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास मंगळवेढ्यातील तरुण सुशिक्षित बेकार युवकांमध्ये आहे म्हणूनच त्यांनी विकासाला मत म्हणून आमदार आवताडे यांच्या कमळाच्या फुलाला मत दिले आहे याची जाणीव ठेवून आवताडे यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा मोठ्या प्रमाणात व्यक्त केले जात आहे. 
शेतात पाणी आल्याशिवाय शेतीचा विकास होत नाही. शेतीचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होत नाही. शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलाचा विकास होत नाही .त्यांच्या विकासासाठी आमदार आवताडे गेली दहा वर्षे प्रयत्न करत आहेत .आता मिळालेल्या सत्तेचा पुरेपूर वापर करून संपूर्ण मंगळवेढा तालुका हा इसवी सन संत दामाजी काळापासून दुष्काळी म्हणून ओळखला जातो. हा दुष्काळीपणाचा कपाळावरचा शिक्का आमदार आवताडे निश्चितपणे पुसून काढतील असा विश्वास या निवडणुकीच्या मतदानातून मतदारांनी व्यक्त केला आहे. 
मंगळवेढा तालुका हा लोकशाही मानणारा आहे, सर्व जाती धर्मांना न्याय देणार आहे .या ठिकाणी कधीही जाती ,दंगली झाल्या नाहीत अशा परिस्थितीत जातीय सलोखा राखताना त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार नाही .परंतु या पुढील काळात देखील सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला लांब जातीतील वर्गाला न्याय देण्यासाठी आमदार आवताडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची गरज आहे. पोलीस स्टेशनमध्ये खोटे ॲट्रॉसिटी दाखल होण्याची पद्धत बंद झाली पाहिजे .मात्र याचवेळी खरे ॲट्रॉसिटी देखील दाखल होण्यासाठी त्यांनी सहकार्य केले पाहिजे .इतकेच नव्हे तर कोणत्याही प्रकारे कोणत्याही राजकारणातून कोणत्याही गटा तटाच्या वादातून सर्वसामान्य जनतेवर अन्याय होऊ नये यासाठी दोन्ही बाजू त्यांनी तपासून पहाव्या. शक्यतो वाद पोलीस स्टेशन पर्यंत न जाता ग्रामीण पातळीवर व शहरात देखील सामांजसपणाने वाद मिटवून मंगळवेढा शहर व तालुका हे शांततेचे प्रतीक यापुढे पाच वर्षे नव्हे तर कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे यासाठी देखील त्यांनी सजग राहण्याची गरज आहे .गेल्या दोन्ही निवडणुकीत आवताडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. यामुळे त्यांनी आता शहराबरोबर ग्रामीण भागात देखील प्रत्येकाशी स्वतः संपर्क ठेवून स्वतः जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन प्रश्न सोडवण्याची गरज आहे. प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्याच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत करण्याची गरज आहे .परंतु प्रश्न स्वतः समजून घेतले तर कोणावर अन्याय होणार नाही .सामान्य जनतेला संत नगरीत आपला लोकप्रतिनिधी हा संत आहे असा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निकालाने आवताडे यांच्यावर आली आहे .समाधान आवताडे हे नावातच समाधानी असल्यामुळे आता ते सर्वसामान्य जनतेला सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय देऊन सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवतील यातच आमदार आवताडे यांचे नाव समाधान म्हणून पूर्ण होईल.

Post a Comment

0 Comments