अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अपहरण केलेल्या आरोपीस पकडण्यात
पो नि महेश ढवाण यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले
मंगळवेढा/ संतसूर्य वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी नाशिक येथून आरोपी किशोर मधुकर रणदिवे याला पोलीसांनी ताब्यात घेवून अटक केली आहे. दरम्यान न्यायालयात त्या आरोपीस उभे केल्यावर न्यायालयाने आरोपीस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी,यातील आरोपी किशोर मधुकर रणदिवे हा भीमा नदीकाठ परिसरात राहत असून त्याने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून दि.12 सप्टेबर रोजी अपहरण केल्याने त्याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली बोराळे बीटचे पोलीस हवालदार तथा तपासिक अंमलदार महेश कोळी यांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे तो नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुका येथे असल्याची माहिती त्यांना मिळताच तेथे जावून त्यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यास बेड्या ठोकल्या. तो आरोपी अंबड येथे भाड्याची खोली करुन त्याने आश्रय मिळविला होता. एका फर्निचर व्यवसायाकडे तो काम करत असल्याची माहिती तपासात उघड झाली. आरोपीला अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर पिडीत मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments