मंगळवेढा/संतसूर्य वृत्तसेवा
तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून यामधून पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे, जागोजागी माहिती फलक लावणे, भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारणे,भाविकांसाठी विश्रांतीगृह उभारणे,भाविकांच्या बैठकीची व्यवस्था करणे, निवारा शेड उभा करणे, पदपथ मार्ग तयार करणे, मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे,कचराकुंडी बांधणे, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आदी कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना समाधान आवताडे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय, जल पर्यटन, धार्मिक निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन, विकासाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या प्रस्तावास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने 342 कोटी 75 लाखाच्या खर्चाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता त्या प्रस्तावातील 282 कोटी 75 लाख इतक्या किमतीच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना सनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी लवकरच या कामांच्या निविदा निघून कामे चालू होतील असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले
Post a Comment
0 Comments