Type Here to Get Search Results !

संतसूर्य

राजकीय हालचालींना वेग - भगीरथ भालके यांना तुतारी, समाधान आवताडे यांना कमळ, प्रशांत परिचारक ओबीसी डी एन ए च्या माध्यमातून अपक्ष म्हणून घेणार कपबशी...?


मंगळवेढा - विक्रांत पंडित.

       पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी निश्चित असली तरी ती पहिल्या टप्प्यात जाहीर न केल्यामुळे भाजपची उमेदवारी अवताडे यांना का जाहीर झाली नाही अशी चर्चा रंगली आहे. मात्र या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची तुतारी कोणाला मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. परिचारक की भालके असा रंगत आलेल्या सामना शेवटच्या टप्प्यात भगीरथ भालके यांच्याकडे जात असल्याचे दिसत आहे. काल दिवसभर भगीरथ भालके यांना तुतरी देण्यात आली आहे. अशी चर्चा सोशल मीडिया बरोबर राजकीय कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेतून रंगली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा अट्टाहास करून त्यांचे नाव जाहीर करणे इथपर्यंतची राजकीय प्रगती भगीरथ भालके यांनी साधली होती. भगीरथ भालके यांची सासुरवाडी आटपाडी असून त्यांच्या नातेवाईकाकडून जयंत पाटील यांच्याशी चांगले रिलेशन असल्याचे समजते, किंबहुना यामुळेच जरी भालके यांनी राष्ट्रवादी सोडून बी आर एस पक्ष स्वीकारला होता तरीही या परिस्थितीत देखील भालके यांना परत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी मिळण्याची शक्यता वाढली असून उमेदवारीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे या पद्धतीची चर्चा मतदारसंघात होत आहे. किंबहुना भालके समर्थक या भाषेत स्पष्ट सांगत आहेत की तुतारी आमचीच आहे, विजय देखील आमचाच आहे, गुलाल आम्हीच उधळणार आहे. 
दरम्यान परिचारक यांच्याकडून शरद पवार यांचे कडे कार्यकर्त्यामार्फत, समर्थकामार्फत उमेदवारीबद्दल चर्चा झाली होती. परंतु खुद्द परिचारक यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली नसल्यामुळे आता परिचारक तुतारी घेण्याची शक्यता संपली असून ते दोन दिवसात अपक्ष अर्ज दाखल करून कपबशी घेण्याची शक्यता वाढली आहे. याचवेळी उमेश परिचारक यांनी आम्ही चार मतदारसंघासाठी एकच भूमिका घेणार आहोत, जनतेची कार्यकर्त्याची मते जाणून घेत असून निवडणूक लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. आत्तापर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वात मोठा गट म्हणून परिचारक यांचा गट ओळखला जातो, या पार्श्वभूमीवर परिचारिकांना पंढरपूर शहर व 22 गावातून मोठे मताधिक्य मिळू शकते. त्यांना मंगळवेढ्यातून बरोबरीला येणे किंवा मताधिक्क मिळवणे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या ही जबाबदारी शिवानंद पाटील, अजित जगताप, भारत बेद्रे ,भारत पाटील, बसवराज पाटील या तरुण कार्यकर्त्याकडून घेतली जात आहे. तर शिवाजीराव काळुंगे, रामकृष्ण नागणे, इनुसभाई शेख, यादाप्पा माळी, ज्ञानदेव जावीर, नंदकुमार हवनाळे, शिवाजीराव नागणे या जेष्ठ मंडळींकडून मार्गदर्शन घेऊन राजकीय हालचाली केल्या जात आहेत. परिचारक यांनी अपक्ष लढावे की तुतारी घ्यावी यावर देखील मतदार संघात जोरात चर्चा होत होती. परंतु गेली 35 ते 40 वर्ष पंढरपूर तालुक्यात राजकीय वर्चस्व असलेले परिचारक हे मुरब्बी जुने जाणते राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, त्यांनी निश्चित असा डाव ठेवून त्या पद्धतीने हालचाली सुरू करून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी हा डी एन ए ठेवून त्यांनी या मतदारसंघात काम केले तर त्यांना पंधरा वर्षापासून दूर असलेली त्यांचीच आमदारकी निश्चितपणे परत मिळू शकेल. गेले दोन दिवस मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात ते अनेकांच्या संपर्कात असून सकाळपासून रात्री बारापर्यंत त्यांनी मंगळवेढा शहरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. यामध्ये ते संबंधित नेता, कार्यकर्ता यांना आजमावून पहात आहेत. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकीतील चुका त्यांनी टाळण्यास सुरुवात केली असून त्यांना देखील पुढील नेता, कार्यकर्ता, चाहता यांची कुवत, क्षमता लक्षात आली असून तो निष्ठावंत आहे का तोंडावरचा कार्यकर्ता आहे हे देखील आता प्रशांत परिचारक यांना चेहरा वाचून समजत आहे. यामुळे या निवडणुकीत परिचारक यांनी निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याची चर्चा राजकीय निरीक्षकातून व्यक्त केली जात आहे. उमेश परिचारक यांनी समाधान आवताडे यांना 50,000 मते मिळाली होती. वरची मते व विजय देखील आमच्यामुळेच मिळाला असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच परिचारक यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माझी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांची देखील त्यांनी दोन तास भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली असल्याचे समजते. प्रामुख्याने सहकार क्षेत्रात बबनराव आवताडे यांना मोकळीक दिली जाईल इथपर्यंतची चर्चा झाली असल्याची चर्चा बाहेर होऊ लागली आहे. होत असलेल्या निवडणुकीमध्ये याचा देखील गंभीर परिणाम निवडणुकीवर होणार असल्याची शक्यता अधिक दिसत आहे. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणणे अवघड असते परंतु पाडणे फारसे अवघड नसते. थोडा उलट सुलट प्रचार, थोडी बदनामी केली तरी त्या बदनामीचा परिणाम मात्र मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या अनुभव हा सगळ्यात पारंपारिक आहे. दरम्यान परिचारक गटाची भूमिका आज, उद्या या दोन दिवसात क्लिअर होईल अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
        विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी निश्चित असून आता केवळ ती जाहीर करण्याची औपचारिकता राहिली आहे. मतदारसंघांमध्ये 3000 कोटी रुपयांची विकास कामे केली असल्यामुळे स्वतः अवताडे व त्यांचे समर्थक त्यांनी केलेला प्रचार त्यांना मिळत असलेला प्रतिसाद यामुळे त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांना लाडक्या बहिणीमुळे विजय निश्चित झाला असल्याचे जाणवत आहे. याशिवाय मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होत असल्यामुळे या लढतीकडे आता धर्म, जात या फॅक्टरने पाहिले जात आहे. यामध्ये देखील त्यांना नशिबाची बाजू आपल्या बाजूनेच राहील असा विश्वास वाटत आहे. गेल्या तीन निवडणुकीच्या तुलनेत पंढरपूर तालुक्यात कासेगाव, गादेगाव सह पंढरपूर शहरात समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली असून स्वतःची ताकद निर्माण केली आहे. त्यांना अनेक नेते, कार्यकर्ते मिळाले आहेत. परंतु पंढरपूर मध्ये याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. भगीरथ भालके यांचा गट लूज झाला आहे यामधील काही नेते कार्यकर्ते भविष्यात अवताडे यांना मिळू शकतील जे कधीच परिचारक यांच्याकडे जात नाहीत. यामुळे अवताडे यांना आपली नाव विजयाचा तीर पार करेल असे सध्या वाटत आहे. 
       येणाऱ्या काही दिवसात प्रचाराला वेग येणार आहे. विचार मंथन होणार आहे. शेषनागावर उभारलेली पृथ्वी आता विधानसभेच्या निवडणुकीत कोणाच्या डोक्यावर उभी राहील, कोणाला लोकप्रतिनिधीचा लोकमुकुट मिळेल याकडे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
मनसेकडून सर्वात प्रथम उमेदवारी जाहीर झालेले दिलीप भाऊ धोत्रे यांना पंढरपुरात चांगला प्रतिसाद आहे. ते त्या ठिकाणी किती मते मिळवणार, त्याचा परिणाम कोणावर होणार...? हे देखील गांभीर्याने घेतले जात आहे. त्यांच्या प्रयत्नाला मंगळवेढ्यात मात्र अजूनही यश मिळालेले दिसत नाही. त्यांना देखील मंगळवेढ्यात हवसे गवसे नवसे कार्यकर्ते भेटले आहेत. त्यांची क्षमता व कुवत राजकीय दृष्ट्या किती आहे यावर त्यांना मंगळवेढ्यात किती प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
   - विक्रांत पंडित.
     संतूसूर्य.

Post a Comment

0 Comments