Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मागे कीर्ती राहील असे सत्कर्म करत रहा - ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर
मंगळवेढा/ विक्रांत पंडित 

- मानव जन्म पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे आई-वडिलांच्या सेवेला प्राधान्य देऊन सत्कर्म करण्याचे भाग्य पदरात पाडून घ्या, कावळा जसा झाडावरून तसा देहातून जीवही निघून जाईल, आपल्या मागे कीर्ती राहील असे कर्म करा असे भावनिक आवाहन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांनी केले आहे.
सोलापूर लेबर फेडरेशनचे जेष्ठ माजी संचालक स्वर्गीय महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनसेवेमध्ये आपली सेवा मांडत असताना त्यांनी वरील संदेश दिला आहे. क्षणभंगुर मानवी जीवनाचा कोणताही भरवसा नसल्याने वर्तमान काळातील प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या आणि हे करत असताना भूतकाळातील गोष्टींना थारा न देता भविष्यकाळाची आखणी करा त्यामुळे मानव धर्माच्या सुखकर व समाधान कारक जीवन प्रवासाची व्याख्या आपणास निश्चितपणे अवगत होईल असेही त्यांनी आपल्या सेवेमध्ये म्हटले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते स्व.महादेवराव आवताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर दुपारी १२.३० पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महात्मा येथून निघून जातो तो दिवस म्हणजे पुण्यतिथी होय. अतिशय संघर्षशाली परिस्थितीमध्ये स्व.महादेवराव आवताडे यांनी अपार कष्ट आणि सातत्यपूर्ण कार्य करून आवताडे परिवाराची घडी भक्कम केली आहे. आई जरी हळव्या क्षणांची साक्षीदार असली तरी दणकट खांद्याच्या बापाचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आई-वडील हे भगवंताचे प्रतिरूप असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्येच आपणास ईश्वराचे दर्शन घडत असते. बाप मनाच्या माणसाला थकण्याचा व रुसण्याचा अधिकार नसल्यामुळे तो आपल्या कौटुंबिक रहाट गाड्यासाठी रात्रंदिवस झिजत असतो, ही आत्ताच्या पिढीने जाणले तरच त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. आई वडील माझ्याकडे असतात असे म्हणण्यापेक्षा मी आई-वडीलांकडे असतो असे सांगणे म्हणजे मातृ-पितृ नात्याची उंची वाढवणारे मोठे मानदंड ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.लि.चे चेअरमन संजय आवताडे, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, सभापती सुशील आवताडे, कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शैलेश आवताडे, युवा कृषी उद्योजक स्वप्निल आवताडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सामाजिक, राजकीय,सहकार, अर्थकारण, शैक्षणिक, व्यवसायिक कार्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच आवताडे परिवारातील नातेवाईक आणि इतर नागरिक व महिला-भगिनी, विरवडे सोहाळे व मंगळवेढा शहरातील विविध भजनी मंडळ वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments