मंगळवेढा/विक्रांत पंडित
:- स्व.संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय कृष्णनगर मंगळवेढा व स्व.यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढ्याच्या माजी उपनगराध्यक्षा मीराताई चेळेकर व प्रमुख पाहुण्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा नकाते ,शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आयशा शेख या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुरेखा नकाते यांनी यशवंतराव चव्हाण हे मराठी मनाचा मानबिंदू असून त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे स्थान आहे. शाहू, फुले ,आंबेडकर ही त्यांची श्रद्धास्थाने होती .सर्व प्रगतीची पाळेमुळे शिक्षणात आहेत .अशी त्यांची पक्की धारणा होती. म्हणून त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत शिक्षण विषयक धडाकेबाज निर्णय घेतले. ते दूरदृष्टी असलेले नेते होते. देशावर आलेल्या संकटाच्या वेळी ते मदतीला धावून आले .राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांनी वाचनात व लेखनात खंड पडू दिला नाही. समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतराव चव्हाण यांचे वर्णन करता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभी छत्रपती संभाजी राजे ,सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रास्ताविकातून त्यांनी प्रतिष्ठानचे कार्य व नियोजित उपक्रमांचा आढावा सांगितला.
याप्रसंगी भारत मासाळ यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, यशवंतरावांचे महाराष्ट्र राज्य निर्मितीतील योगदान स्पष्ट करीत यशवंतरावांच्या जीवनातील काही किस्से सांगितले. आयेशा शेख यांनी यशवंतरावांचे आधुनिक महाराष्ट्रातील जडणघडणीतील योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक महादेव जिरगे ,भीमराव घुले, भारत मासाळ ,सचिन ढगे, प्रभाकर नकाते, विनायक चव्हाण, विराट जिरगे, इसाक शेख ,नर्गिस शेख, राधिका कंगोरे ,प्रतिभा माळी, मेघना क्षीरसागर,सिद्धी जिरगे,अमन शेख,उदाजी कांबळे,ओम चेळेकर,संदेश काळुंगेराजेंद्र ,रोहिणी गायकवाड, राजेंद्र गोवे, ऋषिकेश गायकवाड आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले.
आभार इसाक शेख यांनी मानले.
Post a Comment
0 Comments