मंगळवेढा / विक्रांत पंडित
वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे दिला जाणारा अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार यावर्षी मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली आहे.
वैभव नायकवडी म्हणाले, हुतात्मा संकुलाने पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांवर वाटचाल कायम ठेवत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा गौरव करण्याची परंपरा जपली आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. अरुणभैय्या नायकवडी यांच्या २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १९ व्या स्मृती समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बरोबरीने आटपाडी पाणी संघर्ष चळवळीत काम केले आहे. शिवाय ते मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून काम केले असून तसेच ते प्रभावी वक्ते आहेत.
गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रा शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा येथे धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून काम करत आहेत. तसेच सीताराम कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी व शेतमजूर कष्टकऱ्यांना त्याची देयके वेळेत बिले अदा करून जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
सदर पुरस्कार वितरण शनिवार २४ फेब्रुवारी रोजी अरुणभैय्या नायकवडी यांच्या १९ व्या स्मृतिदिनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक सभागृहात होईल, असेही वैभव नायकवडी यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments