धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा
शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव
मंगळवेढा /विक्रांत पंडित
धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड, मंगळवेढा येथे दि. 17, 18 व 19 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचलिका अॅड. दिपाली काळुंगे - पाटील यांनी दिली आहे.
धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची पंचवीस वर्षे समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली. ठेवीदारांचा विश्वास जपणं हीच मूल्यवान बांधिलकी समजून काम केले. सामान्यांचे संसार उभे करणारी अर्थनीती माणसांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच जतन केली. गेल्या पंचवीस वर्षांतील वाटचालीचा, त्याच्या सिंहावलोकनाचा यथार्थ अभिमान म्हणून हा सोहळा साजरा होत आहे.
बुधवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सदर महाआरोग्य शिबिराचे उदघाटन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर उस्थितीत राहणार आहेत.
दुपारी 2 वा. धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे हे राहणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. प्रीती शिंदे यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील 21 पतसंस्थांच्या महिला चेअरमन यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व आजी-माजी संचालकांचा सत्कार व गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे.
सायंकाळी 7 वाजता कुणाल मचाले सादरकृत मराठमोळ्या संस्कृतीचा नृत्य, गीत व संगीताचा अविष्कार असणारा आपली संस्कृती या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे-पाटील यांच्या हस्ते तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवार दि. 18 जानेवारी सकाळी 9.30 वा.संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचन करांचा गौरव म्हणून संतपूजा हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विष्णुपंत आवताडे हे राहणार आहेत. यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज देहुकर, वासकर महाराज फडप्रमुख ह भ प चैतन्य महाराज वासकर, संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. डॉ.जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 2 वाजता धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टिस्टेट तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच धनश्री मल्टीस्टेटच्या आजी-माजी संचालकांचा सत्कार, शिलाई मशीन वाटप, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे अमृत महोत्सवी स्मरणिकाचे प्रकाशन व धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाची सभासदांना भेट देण्यात येणार्या चांदीच्या नाण्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी 7 वा. धनश्री व सिताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर संगीत रजनी मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार शिरोमणी शुगरचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
यादरम्यान सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, पार्श्वगायिका कविता पौडवाल, हास्यजत्रा फेम पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, महाराष्ट्राचा महागायक विजेता महंमद आयाज हे गायक उपस्थित राहून आपल्या सदाबहार मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहेत.
शुक्रवार 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मंगळवेढा शिवार वैभव म्हणून शेतीतील सर्वोत्कृष्ठ उत्पादन पिकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख हस्ते तर अध्यक्ष म्हणून अॅड. नंदकुमार पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कृषी विभागातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विजय चोरमारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुराव गायकवाड तरी अध्यक्षस्थानी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 4 वा. धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन,पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत.तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, धनश्री व सिताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे - मुदगल यांचेसह प्रा. शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.
Post a Comment
0 Comments